ज्ञानोपसाक दक्षिण काशी अर्थात वाई
दक्षिणेतील काशी अशी जिची कीर्त
रमले इथे तपस्वी तर्क तीर्थ
इथे मराठी महाविश्वकोष जन्मा येई
अशी आपुली ज्ञानोपसाक वाई...
अश्मयुगीन काळाच्या खुणा अंगा खांद्यावर लेवून आधुनिकतेच्या रेट्यातही आपल्या महान प्राचीन संस्कृतीचा ठेवा जगणाऱ्या व जपणाऱ्या कलासक्त वाई शहरास एकदा अनुभवावं अशी माझी इच्छा! जी फिरस्ती महाराष्ट्र ग्रुपच्या रूपाने प्रत्यक्षात उतरून फलद्रूप झाली. अनुराग सर, आदित्य सर आणि प्राची या अभ्यासू, जाणकार त्रयीच्या मार्गदर्शक माहितीच्या वर्षावात वाई वारसा सहल सुंदर, अविस्मरणीय झाली. त्याबद्दल या त्रिमूर्तीचे मनापासून आभार!!
वाई हे नाव 'वाय ' अर्थात विणकर किंवा कोष्टी या संस्कृत शब्दावरून पडले असावे. तसेच धोमपासून कोरेगाव पर्यंतच्या भागाला ' वायदेश ' म्हणत असत हे काल समजले. आज माझ्या वाचनात असे आले की महानुभाव लिळाचरित्र ग्रंथाची जी चार पाच संस्करणे झाली, त्यापैकी एका संस्करणाला ' वाईदेशकरपाठ ' म्हणतात.ते या वाईच्या संदर्भातीलच असेल का? हे संस्करण 15 व्या शतकात तयार झाले असावे असा कयास आहे.
तर वाई च्या सफारीची सुरवात शांत, सुंदर भद्रेश्वर मंदिरात दर्शन घेऊन झाली. त्यानंतर ध्योम्य ऋषींच्या समाधीवर उभ्या असलेल्या आणि तेथील पुष्करिणीतील कासवावर आरूढ असलेल्या कातळ शिल्पातील नंदीचे एकमेव शिव मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिद्धेश्वर पंचायतन मंदिराला भेट दिली. तेथील पंचमुखी सदाशिव खांब, विष्णू प्रल्हाद मंदिर,उग्र व शांत नरसिंह मूर्ती पाहून खूप प्रसन्न वाटलं.
मंदिर पाहताना एक मराठी चित्रपट गीत आठवलं..
धौम्य ऋषी सांगतसे रामकथा पांडवा
रामासंगे जानकी नांदताना काननी
सोनियाचा सांबर आला तिच्या अंगणी......
त्यानंतर इतिहासपुरुष नाना फडवणीसांचा आखीव रेखीव सुरेख प्रशस्त वाडा पाहीला.वाड्याच संवर्धन अलीकडील काळात झालं आहे असं समजलं.ते निगुतीने केलं आहे त्या मुळे वाड्याला गतवैभवाची झळाळी चढली आहे. हळदी कुंकू चौकात होणाऱ्या त्या सभारंभाच्या कल्पनेत काही पळ रमून गेले होते.सुंदर, सुशील विविध आभूषणांनी नटलेल्या, काकणाच्या किणकिणीत, हास्याच्या, गप्पांच्या कारंज्यात न्हाऊन निघणाऱ्या त्या घरंदाज सवाष्णीनां या चौकाने किती जवळून पाहिलं असेल. नाही का? वाड्या बाहेर नाना फडवणीस यांनी रुजवलेल्या ' गोरखचिंच ' या मूळ आफ्रिकेतील रोपट्याचे प्रचंड वृक्षात झालेलं 250 वर्षांपासूनच रूपांतर बघितलं आणि थक्क झाले..
तेथून पुढे मेणवली घाट, घाटाकडे उतरणाऱ्या वाड्यातील स्त्रियांच्या सोयीसुविधेसाठी केलेल्या पायऱ्या पाहून विचारपूर्वक केलेल्या वास्तू नियोजनाचे कौतुक वाटले.. मंदिराकडे जाणाऱ्या भिंतीवर दिवे ठेवण्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या कोनाड्यांची सुबक रांग बघितली.त्यानंतर मेणेश्वर मंदिर, तेथील मराठ्याच्या शौर्याची साक्ष चिमाजी अप्पानी आणलेली पोर्तुगीज घण्टा बघितली.
पुढे महागणपती उपाख्य ढोल्या गणपती ची मूर्ती पाहून मूर्तीवर डोळे काही क्षण खिळून राहिले. भव्य मूर्ती, प्रशस्त प्रांगण.तशाच पद्धतीचे काशी विश्वेश्वर मंदिर. भव्य आणि प्रशस्त!!
त्यानंतर वाईचे शिल्पकार रास्ते यांचा गंगापुरीतील वाडा, उमा महेश्वर मंदिर, सुंदर सूर्य मूर्ती पाहून भारावून गेले. या प्रत्येक मंदिरातील आगळं वेगळ किर्तीमुख पाहणं ही एक वेगळीच पर्वणी होती.तसाच अनुभव कलाकुसरीने नटलेल्या कातळ दगडी नंदीचा!!
आता शेवटच्या टप्प्यात तुम्हाला एक surprise देणार आहे असं जेव्हा अनुराग सरांनी सांगितलं तेव्हा उत्सुकता वाढली. सुखावणार ते surprise म्हणजे 1905 साली चौन्डे महाराजांनीं स्थापन केलेली श्री गोवर्धन संस्था. आमच्या बरोबर असलेले आदित्य यांचे ते पणजोबा. महान विभूतींच्या भेटीने पावन झालेली ही भूमी पाहून मन हर्षभरीत झाले.तिथली श्रीकृष्णाची विलोभनीय मूर्ती मन मोहवून टाकते. चौन्डे महाराज यांचं गोसंगोपनाचं कार्य पाहून नतमस्तक व्हायला होतं . त्यांच्या पुढील वंशजांनी त्यांचं हे समाजहिताचं सत्कार्य समर्थपणे जपलं आहे, वृद्धीन्गत केलं आहे.खरंतर तिथून पाय निघत नव्हता.पण पुन्हा इथे नक्की येऊ हा विचार केला आणि आदित्य चौन्डे व त्यांच्या कुटुंबियांना मनापासून शुभेच्छा देऊन पुण्याच्या दिशेने वाईची सुंदर आठवण मनात घोळवत परतीच्या प्रवासाला सुरवात केली.....
उत्तमोत्तम वास्तूशिल्पे जिच्या
वैभवाची गातात गाणी..
जिथे नांदली वेद समृद्ध वाणी..
जिथे प्राचीनतेची अजून नवलाई..
अशी सम्पन्न भावली आम्हा वाई..
🙏🙏🙏
पुन्हा एकदा ग्रुप leaders यांचे आणि सर्व जिज्ञासू मनमिळाऊ सहप्रवाशांचे खूप खूप आभार!!
~~वैशाली खोकराळे पाटील.
Comments
Post a Comment