3,4 जानेवारी.. चोरवणे गाव मार्गे नागेश्वर - वासोटा( व्याघ्रगड) ट्रेक
सह्याद्री हे शब्द उच्चारताच राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा या गीता बरोबरच आपल्या नजरेसमोर उभे राहतात ते युगप्रवर्तक छत्रपती शिवराय स्वराज्यासाठी छातीचा कोट करणारे मावळे आणि अर्थात सह्याद्रीतील गडकोट आणि घाटवाटा!!भौगोलिक दृष्ट्या सह्याद्री हा महाराष्ट्राचा निर्माता आणि हिंदुस्थानाचा मुलाधार मानला जातो. महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा किंबहुना संपूर्ण जगाचा इतिहास आणि भूगोल लिहिताना सह्याद्रीचा उल्लेख प्राधान्याने करावा लागतो. हिमालय ही भारताची तर सह्याद्री ही महाराष्ट्राची ओळख मानली जाते. हिमालयाची भूमी निवृत्तीप्रधान तर सह्याद्रीची भूमी प्रवृत्तीप्रधान.. हिमालयाला देवभूमी तर सह्याद्रीला वीरभूमी मानले जाते. याच वीरभूमीतील ऐतिहासिक किल्ले वासोटा म्हणजेच व्याघ्रगड व आध्यात्मिक श्रद्धास्थान प्राचीन स्वयंभू शिवलिंग नागेश्वर या ठिकाणी trek करण्याचा योग शनिवार व रविवार दि. 3 व 4 जानेवारी 2026 रोजी STF च्या माध्यमातून जुळून आला.
ट्रेक साठी शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास आम्ही सर्व ट्रेकर्स चोरवणे ता.खेड जि. रत्नागिरी या गावी पोहोचलो. चोरवणे गाव छोटसं पण आखीव रेखीव,टुमदार आहे इथल्या उतरत्या छपरांच्या कौलारू घरांमुळे आणि काहीशा दमट हवामानामुळे आपण कोकणात आलो आहोत याची जाणीव झाली. तिथे पोहोचल्यावर श्री. प्रकाश शिंदे यांच्या घराच्या ओसरीत STF तर्फे आयोजित गरमागरम चविष्ट उपीट, मसाला दूध व वाफाळत्या चहासोबत मस्त नाश्ता झाला.
ट्रेकिंगची सुरुवात श्री. सुरेंद्र दुगड म्हणजेच सर्व ट्रेकर्सचे प्रेरणास्थान असे भाऊ यांच्याकडून ट्रेक विषयीच्या तसेच तिथल्या भौगोलिक स्थानाविषयीच्या प्रस्तावनेने झाली.
हा ट्रेक दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करायचा होता पहिला टप्पा चोरवणे गावातून नागेश्वर शिखरावर असणाऱ्या महादेवाच्या मंदिरापर्यंत होता व दुसरा टप्पा नागेश्वर महादेव मंदिरापासून वासोटा किल्ल्यावर जाण्याचा होता. शनिवारी रात्री म्हणजे ट्रेकिंगच्या पहिल्या दिवशी नागेश्वर मंदिराच्या निसर्गनिर्मित गुहेत आम्ही सर्वजण मुक्काम करणार होतो. सर्वांनी अंथरूण पांघरून किंवा स्लीपिंग बॅग तसेच उबदार कपडे सोबत घेतले होते. नागेश्वराच्या त्या कातळ गुहेत रात्रभर मुक्काम करायचा आहे ही कल्पनाच खूप रोमांचकारी वाटत होती... मनात येत होतं की या अजस्त्र सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर बागडत असतोच की आम्ही नेहमी... गडकिल्ल्यावरच्या शिखरांवर फुटणार तांबडं, क्षितिजावर दिसणारा तो नारंगी गोळा, नेढ्यातला भन्नाट सह्यवारा, फुला पानांचे सुखद गालिचे, निसर्गाची अंगभूत लेणी, सह्याद्रीच कातळ वैभव, अचंबित करत उलगडत जाणाऱ्या घाटवाटा आम्हा ट्रेकर्स मंडळींना सह्याद्रीत एकरूप होण्यासाठी नेहमीच खुणावत असतात.... पण आज त्याच्या त्या कणखर कुशीत झोपायचं होतं, पहुडायचं होतं...त्याच्या राकट परंतु आश्वासक हाताने तो आज आम्हा थकल्याभागल्या भटक्यांना मायेने थोपटणार होता... अजस्त्र, प्रचंड,अंगावर येणार असं त्याचं ते खम्बिर अस्तित्व आज आणखी प्रकर्षाने आम्हाला जाणवणार होतं...कसा असेल अनुभव... नक्कीच अविस्मरणीय असेल.. अशा या सर्व विचारांच्या शृंखलेतून नागेश्वराकडे जाण्यासाठी मार्गक्रमणा केली... आणि खरंच त्या मुक्कामात त्या जिव्हाळ्याच्या सह्याद्रीने त्या सर्व भावभावनांची अनुभूती दिली...
नागेश्वर हा एक सुळका असून त्या दिशेने एक वळणदार पायवाट जाते. चार ते पाच तासाचा खडा आव्हानात्मक चढ चढून गेल्यावर एक पठार लागते.या पठारावरून डावीकडे जाणारी वाट नागेश्वराकडे तर उजवीकडची वाट वासोट्याला जाते तर सरळ खाली जाणारी वाट नागेश्वर कुंडाकडे जाते. नागेश्वर वरून वासोटा समोर दिसतो. डोंगराच्या धारेवरून पुढे खोट्या नागेश्वरला वळसा घालून दोन ते तीन तासात वासोटा किल्ल्यावर पोहोचता येते. पूर्ण मार्गात वाटेत कुठेच पाणी नसल्यामुळे पाण्याचा पुरेसा साठा बरोबर घेऊन जावे लागते. ट्रेकच्या वाटेवर सुरुवातीला काही ठिकाणी जांभ्या दगडाच्या पायऱ्या तर काही ठिकाणी लोखंडी शिड्या व रेलिंग असल्यामुळे ट्रेक करणे काहीसे सुलभ झाले. हा पूर्ण ट्रेक शरीर व मनाची कसोटी पाहणारा परंतु नैसर्गिक वैविध्यतेने नटलेला सुंदर ट्रेक आहे.दक्षिणेला वासोट्यापर्यंत पसरलेली सह्यधार आणि पश्चिमेला खोलवर वासिष्ठीचे खोरे यांचे मोहक दृश्य येथे दिसते.
नागेश्वर सूळक्याच्या नागाच्या फण्यासारख्या कातळ कड्यात दक्षिणाभिमुखी गुहा आहे. या निसर्गनिर्मित गुहेत प्राचीन स्वयंभू शिवलिंग असून त्यावर नैसर्गिकरित्या जलसिंचन होते. महाशिवरात्रीला इथे जत्रा भरते. बाकी वर्षभर सहसा ट्रेकर्स व्यतिरिक्त कोणी इकडे फिरकत नसावे. हा पूर्ण वन्यजीवाने समृद्ध असा भूभाग वनविभागाच्या अखत्यारित येतो.
चार- साडेचार तास आणि त्यातील शेवटच्या दोन तासाच्या खडया चढणीनंतर आम्ही गुहे जवळ पोहोचलो. तिथे सर्वांनी एका झाडाखाली जेवण केले. संध्याकाळी श्री. बाळकृष्ण कांबळे यांनी गुहेत होम केला. होम हवनासाठी लागणारी पूर्ण सामग्री तसेच होमपात्र घेऊन ते आले होते. गुहेतील शिवलिंगा समोर सुस्पष्ट मंत्रोच्चारांसहित सुमारे दोन तास त्यांनी होमहवन केले. आम्ही अनेकांनी मिळून महामृत्युंजय जप केला तसेच काही स्तोत्रे म्हटली. खूप प्रसन्न वाटले....मनात आलं की अशा निर्जन, निर्मनुष्य ठिकाणी एखाद्या तपस्व्याला, एखाद्या योग्याला ज्ञान प्राप्ती झाली असेल कदाचित... या नि:शब्द पसाऱ्यात तो हरवलाही असेल.. पण स्वतःला हरवून ही पुन्हा सापडला असेल तो नक्कीच स्वतःला....भवतालाशी एकरूप होऊन स्वस्वरूपाची जाणीव झाली असेल कदाचित त्याला... अशाच ठिकाणी तर होऊ शकते ती बहुधा...
**II देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
तेणे मुक्ती चारी साधियेल्या II**
सलोकता,समीपता,सरूपता आणि सायुज्यता या त्या चार मुक्ती होत. या चार मुक्ती देवाचिये द्वारी टप्प्याटप्प्याने मिळावल्या असतील त्या ज्ञानवृद्धानीं... त्या मुक्ती विषयी खूप काही बोलण्यासारखं आहे...असो.
संस्मरणीय अशा या अनुभवासाठी श्री. बाळकृष्ण यांचे व श्री.भाऊंचे मनापासून आभार!!
दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी पहाटे साडेचार वाजता आम्ही डोंगर उतरायला सुरुवात केली. काळ्यामिट्ट अंधारात, टॉर्चच्या उजेडात बरोबर तीन तासांनी सकाळी साडेसात वाजता गावात पोहोचलो.पोहे, चहा असा फक्कड नाश्ता करून त्या दिवशीच्या पूर्वनियोजित बेतानुसार सर्वजण गुहागरला गेलो.गुहागर ला जाणाऱ्या वाटेवर श्रीरामवरदायीनी देवीचे मंदिर आहे. तेथील देवीच्या मनोहारी मूर्तीचे मनोभावे सर्वांनी दर्शन घेतले.गुहागरमधे एका स्थानिक कोकणी कुटुंबाकडे भाऊंनी शाकाहारी जेवणाची व्यवस्था केली होती. जेवणात दोन उकडीचे मोदक होते. पोटभर जेवून आम्ही अर्धा तास समुद्रकिनाऱ्यावर छान वेळ व्यतित केला.आज भरती असल्यामुळे आत समुद्रात पोहणं सर्वांनी टाळलं....मी त्या अफाट,अथांग समुद्राकडे नुसतं बघत राहण्याचा आणि शक्य होईल तेवढं त्याच्याशी तादात्म्य साधण्याचा आनंद कवेत घेता येईल तेवढा घेतला.भाऊंनी बोलवल्यावर परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली.. गाडीतील डान्स,गाणी, गप्पांनी प्रवास रंगतदार झाला.अनेक स्मृतीक्षण सोबत घेऊन आम्ही प्रत्येक जण आपापल्या घरट्याकडे परतलो....
श्री. सुरेंद्रभाऊ यांचे आणि STF टीमचे मनःपूर्वक आभार!!
सर्व ट्रेकर्स सहप्रवाशांचेही मनापासून आभार!!
धन्यवाद 🙏
Comments
Post a Comment